ठाणे – ठाणे शहरातील कचराकोंडी दूर होणार असून, सध्या घोडबंदर रोडसह शहरात विविध ठिकाणी साचलेला कचरा महापालिकेने उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रहिवाशी सोसायट्यांमधील झाडांची सुकलेल्या पानांचा कचराही स्वीकारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर आयुक्तांनी घोडबंदर रोड वासियांसह ठाणेकरांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला.
घोडबंदर रोड परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर सोसायट्यांमधील झाडांची सुकलेली पाने स्वीकारण्यास घंटागाड्यांकडून नकार दिला जात होता. तर पुरेसा पाऊस झाल्यानंतरही भेडसावणाऱ्या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज महापालिका मुख्यालयात भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी झाडांच्या सुकलेल्या पानांचा कचरा उचलण्याबरोबरच सध्या ठिकठिकाणी साचलेला कचरा ताबडतोब उचलणार असल्याचे स्पष्ट केले.
डायघर येथील प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो १५ दिवसांपासून बंद होता. त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून, साचलेला कचरा उचलण्यासाठी जादा डंपरची व्यवस्था करण्यात येईल. येत्या दिवाळीपूर्वी शहरातील संपूर्ण कचरा उचलला जाईल, अशी ग्वाही आयुक्त राव यांनी दिली. त्याचबरोबर सोसायट्यांच्या बागेतील झाडांची सुकलेली पाने व फांद्या महापालिकेच्या घंटागाड्या स्वीकारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घोडबंदरला आचारसंहितेनंतर ७५ दशलक्ष लिटर पाणी
ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेने १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर केला आहे. याबाबतची निर्णयप्रक्रिया आचारसंहितेनंतर पूर्ण होईल. त्यापैकी ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा घोडबंदर रोडच्या नागरी वसाहतींकडे वळविला जाईल. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.