लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी ब्रिटनमधील हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता हिंदू मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे २४ तास मंदिराच्या सुरक्षेवर नजर ठेवणे शक्य होईल. त्यांच्या या निर्णयाला सर्वांनी सतारात्मक प्रतिसाद दिला आहे. ब्रिटनमध्ये ४०० हून अधिक हिंदू मंदिरे आहेत.
२०२२ मध्ये ब्रिटनमधील अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले झाले होते. त्यानंतर ब्रिटनमधील हिंदू मंदिराची सुरक्षा वाढवली जावी, यासाठी हिंदूनी ऋषि सुनक यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर सुनक यांनी हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दोन वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी दिला होता.
त्यामध्ये हिंदू मंदिरासाठी केवळ २.५ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे हिंदूमध्ये नाराजी होती. ब्रिटन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येथील गृह मंत्रालय गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू मंदिरे आणि चर्चची सुरक्षा वाढविण्याचे धोरण बनवत आहे. हे नवीन धोरण तयार झाल्यानंतर ब्रिटनमधील मंदिरांनाही मशिदींप्रमाणे सुरक्षेसाठी निधी मिळणार आहे. याच निमित्ताने सुनक ब्रिटनमधील अनेक मंदिरांना भेट देत आहेत.