मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी शेअर करत मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली आहे. दानवे यांनी एक्स अकाऊंटवर म्हटले आहे की, ‘वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहा मध्ये पाच नावे भाजपा नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो. यांचा कारभार उलटा आहे. वाकेन पण मोडणार नाही!’ मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. मात्र या यादीमध्ये खासदार राहुल शेवाळे यांचे नाव नाही. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या यादीत भाजपा आणि अजित पवार गटातील नेत्यांची नावे का, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.