मुंबई – कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर गेला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता पण फडणवीसांच्या काळात व शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली हे उघड सत्य आहे. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची गुजरातच्या हस्तकांनी मागील दोन वर्षात मात्र पुरती वाट लावली आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपा युती सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारने दोन वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे, महाराष्ट्र हे मोदी शाह यांच्यासाठी फक्त एटीएम आहे. राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरात व राज्यात पळवून नेले त्यावेळी शिंदे, फडणवीस व अजित पवार मूग मिळून गप्प बसले होते. फडणवीस यांनी तर गुजरातमध्ये गुंतवणूक होते त्याचे समर्थन केले होते. राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज बनली आहे. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून कंत्राटदारांचे भले केले व त्यातून मलई खाण्याचे काम दोन वर्ष बिनबोभाटपणे सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्टकार्ड वर बोलणे हास्यास्पद आहे, त्यांनी रेटकार्ड वर बोलले पाहिजे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारीचा सामना करावा लागला, त्या संकटातही महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची दखल देशानेच नाही तर जगाने घेतली. गुजरात, उत्तर प्रदेशात या भाजपा शासित राज्यात मृतदेहांचे ढिग लागले होते, त्यामुळे युती सरकारने पाठ थोपटून घेऊ नये. त्यांची कामगिरी व ओळख फक्त ‘गद्दारी’ व ‘खोके सरकार’ एवढीच आहे.
दोन वर्षात महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करून राज्यात अशांतता पसरवण्याचे काम केले. आरक्षणाच्या नावावर जाती जातीत भांडणे लावली, कायदा सुव्यवस्था अत्यंत खालावली असून जंगलराज झाले आहे. महिला सुरक्षित नाहीत, शाळेत मुली सुरक्षित नाही व सत्ताधारी पक्षाचे नेतेही सुरक्षित नाहीत ही या सरकारची कामगिरी आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारी भरती निघत नाही निघाली तर प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटतात, तरुणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे एका पिढीचे भविष्य बरबाद करण्याचे काम युती सरकारने केले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम या सरकारने केले असून राज्यावर ९ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला, हे या सरकारचे काम आहे असा टोलाही पटोले यांनी लगावला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, महाभ्रष्ट युतीला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.