डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे – केसरकर

0

मुंबई – माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेवून सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

15 ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री  केसरकर बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अवर सचिव उर्मिला धारवड, कक्ष अधिकारी ऐर्श्वया गोवेकर, आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, जो सर्वाधिक वाचन करतो, तो सर्वोत्कृष्ट बनतो. यामुळे मुलांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढीस लागावी, यासाठी शासनाने वाचन चळवळ सुरू केली आहे. हा महावाचन उत्सव मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येत असून मागील वर्षी राज्यातील ५१ लाख मुलांनी सहभाग नोंदविला होता. यंदा एक कोटी मुले सहभागी होतील, असे नियोजन केले आहे. मुलांनी पुस्तकाचे वाचन केल्यास जगाचे नेतृत्व करतील.

मराठी आणि जर्मन भाषेत साधर्म्य असून मराठीचे महत्व ओळखून जर्मन शिकविणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. मराठी ही साहित्य आणि संस्कृतीने समृद्ध भाषा असल्याने तिला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री. केसरकर यांनी आभार व्यक्त केले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीचा आणि मुंबईचा नागरिकांनी अभिमान बाळगायला हवा. मराठीमध्ये साहित्य, संशोधन करण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ एकाच छताखाली चारही कार्यालये आणण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन या सर्वात मोठ्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. साहित्यिक हे राज्याचे वैभव असल्याने त्यांची मुंबईत कामानिमित्त आल्यास या इमारतीमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकांचे गाव संकल्पना राबविली. यातून प्रेरणा घेवून प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे एक गाव करण्याचाही संकल्प आहे. विश्वकोष निर्माते लक्ष्मणशास्त्री यांचे वाई (जि.सातारा) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगाव कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली. यावेळी मंत्री केसरकर यांनी मराठी भाषा विभाग आणि इतर प्रकाशकांनी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech