इटानगर – अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होत आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपाने प्रत्यक्ष मतदानाआधीच विजयाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चावोना मीना यांच्यासह भाजपचे आणखी ६ उमेदवार बिनविरोध निवडणूक जिंकले आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते तेची नेचा यांनी केला आहे.
भाजपाचे प्रवक्ते तेची नेचा यांनी सांगितले की, काल २७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या ६० पैकी ८ उमेदवारांविरुद्ध एकाही विरोधी उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. मात्र त्यांच्या या दाव्याला उत्तर देताना अरुणाचल प्रदेशचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी लिकेन कोयू म्हणाले की, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतरच आम्ही निश्चित करू शकू की कोणता उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. आम्ही अशा दाव्यांची पुष्टी करू शकत नाही. कारण बुधवारपर्यंत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची तपशील अद्याप राज्याच्या सर्व भागातून येत आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे की नाही याची खात्री करता येईल. उमेदवारी अर्जांची अजून छाननी सुरू आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसह राज्यातील ६० विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वी ८ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे.