विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण
मुंबई – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या या चर्चेला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून तुपकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्यांनी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून अपक्ष उभे राहिल्यानंतर तुपकरांना सुमारे अडीच लाख मतं मिळाली होती. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीने त्यांना सोबत घेतल्यास फायद्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
तुपकर यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी नाते संपुष्टात आले असून, त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची स्थापना केली आहे. पुण्यातील एका बैठकीत त्यांनी २५ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. बुलढाणा जिल्ह्यात ६ जागांवर लढत देण्याचा त्यांचा मानस असून राज्यभरात लवकरच व्यापक आंदोलनाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तुपकर-ठाकरे भेटीत आगामी राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीच्या गोटात यामुळे नवीन सत्ताकारणाचे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.