छिंदवाडा- मध्यप्रदेशातील काँग्रेसचा गड मागला जाणाऱ्या छिंदवाड्यातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जाबरोबर दाखल केलेल्या संपत्तीच्या कागदपत्रांनुसार त्यांच्याकडे ६५० कोटींची स्थावर, आणि ४८ कोटींची जंगम मालमत्ता आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेचे धनी असलेल्या नकुल नाथ यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावावर एकही कार नाही, आणि त्यांनी वडील कमलनाथ यांना १२ लाख रूपये कर्जाऊ दिले आहेत हे विशेष.
मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत उमेदवार नकुल नाथ यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७.८९ कोटी रूपये कमावले. तर त्यांच्या पत्नी प्रियाने ४.३९ कोटी रूपये कमावले. त्यांच्याकडे ४४.९७ लाख रूपये, तर त्यांच्या पत्नीकडे फक्त ४३,८६६ रूपये रोकड आहे. भारताशिवाय त्यांचे बहरीनमधील बँकेतही खाते आहे. त्यांच्याकडे १४७.५८ कॅरेट हिरे, २.२ कोटी रूपये किंमतीचे १८९६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७.६३० किलो चांदी आहे. याशिवाय त्यांच्याकडे ६.४६ लाख रूपयांचे एक पेंटिंग आहे. त्यांच्या पत्नीकडे ८८१.३१ कॅरेटचे जडजवाहीर आणि २.७५ लाख रूपयांचे सोन्याचांदीचे दागिने आहेत.
छिंदवाड्यात पहिल्या फेरीत १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर पत्नी अलका नाथ यांच्यासह त्यांचे आईवडील होते. नंतर ते प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, काँग्रेस नेते उमंग सिंघार आणि इतर समर्थकांसह रॅलीमध्ये सहभागी झाले.