पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, बीड, नांदेड, परभणी, जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर या ठिकाणी ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून जास्त तापमानाची नोंद झाली आहे.