मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीनंतर ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या तिकीटाच्या प्रतीक्षेत असणारे अंबादास दानवे यांना डावलत ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर अंबादास दानवे यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले. मात्र अंबादास दानवे यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सवरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक होते. यापूर्वी देखील त्यांनी तसे बोलवून दाखवले होते. तर, महाविकास आघाडीत संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे देखील जवळपास निश्चित झाले होते. परंतु, या लोकसभेतून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी याआधीच सुरू केली होती. मात्र, यंदा कोणत्या तरी नवीन चेह-याला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी किंवा मला उमेदवारी द्यावी, असे अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. परंतु, पक्षाकडून तसे होत नसल्याने अंबादास दानवे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.