मुंबई – प्रचारापूर्वीच मविआ फुटला अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. उबाठा गटाने 22 उमेदवार देणार असे जाहीर करत 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच मविआतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे संतप्त झाले आणि त्यांनी या यादीला जाहीरपणे विरोध केला. मुंबई, सांगली अशा अनेक जागांवर वाद सुरू झाले. त्यातच वंचित आघाडीने मविआ समवेत न येता जरांगे-पाटील यांच्याबरोबरच युती करून नवीनच खेळ सुरू केला. उबाठा गटाने 17 आणि वंचितने 6 उमेदवारांची यादी आज जाहीर केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी पसरली.
सांगली, मुंबईतील धारावी, इतर काही जागांबाबत चर्चा सुरू असताना परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. उबाठा आणि वंचितने आमच्याबरोबर बसावे, अजूनही मार्ग निघेल, शिवसेनेने फेरविचार करावा.
सांगली मतदारसंघातून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघावर दावा ठोकणारे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आणि काँग्रेसने उबाठाच्या उमेदवाराला जाहीरपणे विरोध केला. काँग्रेस नेते विश्वजीत कदम म्हणाले की, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे ठरले नव्हते. शिवसेनेने हातकणंगलेची जागा लढवा. कोल्हापूरच्या जागेबाबत ठरले होते की, शाहू महाराज जो पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा सोडायची. त्यांनी काँग्रेस पक्ष निवडला. आम्हाला सांगली मतदारसंघ हवा आहे हे आम्ही खर्गे यांना कळविले आहे. विशाल पाटील यांची उमेदवारी ठरली आहे.
त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ही जागा आम्हाला मिळेल. पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायला तयार आहोत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, अंतिम निर्णय होणे बाकी असताना, चर्चा संपलेली नसताना उबाठाने उमेदवार जाहीर केले. उबाठाने आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यांनी पुनर्विचार करावा. वंचितने जो निर्णय घेतला तो भाजपाला मदत करणारा ठरेल. ठाकरे गटाने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केल्यावर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर विरोध करत वेगळी भूमिका घेण्याचे जाहीर केले आणि काँग्रेसला मुंबईत रस नाही का, असा सवाल विचारला.