खिडकाळीत केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला मंजूरी

0

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यास यश

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील खिडकाळी येथे शैक्षणिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला आज, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना शैक्षणिक संशोधन संस्थांची उभारणी करून हे क्षेत्र ‘रिसर्च हब’ म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने, अतिशय मोक्याच्या असलेल्या खिडकाळी परिसरात संशोधन केंद्र व्हावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश मिळाले असून ठाणे, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई या भागातील तरुणांना संशोधन करण्याची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. त्याच प्रमाणे या भागातील औद्योगिक पट्ट्यासही या संशोधन केंद्राचा फायदा होणार आहे.

राज्य शासनाच्या मालकीचा हा भूखंड उच्च व तंत्र शिक्षण विभागास रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेच्या रुपांतरीत संशोधन केंद्र या शैक्षणिक उपक्रमासाठी विनामूल्य हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही संस्था रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT) यांच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. तर, या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्थेला ‘एलिट इन्स्टिट्यूशन’ हा दर्जा दिलेला आहे. या संस्थेची गणना देशातील आयआयटी, आयएससी, आयआयएसइआरएस या निष्णांत संस्थेबरोबरीने केली जाते.

या प्रस्तावित नवीन संशोधन केंद्रामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील संशोधकांना उत्तम सुविधा असलेली व्यवस्था निर्माण होणार आहे.तसेच केमिकल आणि फुड प्रोसेसिंग क्षेत्रातले अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रात हमखास नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech