पहिल्या यादीत उमेदवारच नाही
ठाकरे गटात निराशा
ठाणे – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे ज्या कल्याण मतदारसंघातून निवडून आले आहेत, त्या कल्याणमधून पहिल्या यादीतून कुणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे, उबाठा गट कल्याण मतदारसंघ लढवणार की नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
मध्यंतरी याबाबत काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते संतोष केणे यांना विचारणा झाल्याची चर्चा होती. त्यामुळे मग युवा नेते आदित्य ठाकरे, फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे, उबाठाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशा नेत्यांची नावे चर्चेत होती. तरीही ठाकरे गटाने कल्याणचा उमेदवार पहिल्या यादीत जाहीर का केला नाही, याबाबत ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे गट कल्याण लोकसभा लढवणार की नाही याबाबतच आता साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे कल्याणमधून खासदारकीची निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा होती. नंतर फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चाचपणी झाली. मात्र त्यांनी असमर्थता व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान पहिल्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव नाही. त्यामुळे ठाकरे गटाने कल्याणसाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पर्याय जवळपास बाद केल्यातच जमा आहे.
त्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचे नाव या कल्याणसाठी जवळपास निश्चित झाले होते. मात्र यादीत केदार दिघे यांचेही नाव नाही. त्यामुळे कल्याणमधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार उतरवणार की नाही, मविआतल्या घटकपक्षांना कल्याण मतदारसंघ लढवण्यास सांगणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाच्या या यादीत, अपेक्षेनुसार लोकसभेच्या ठाणे मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. रायगडमधून माजी खासदार अनंत गीते रिंगणात आहेत. कोकणातील प्रतिष्ठेच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातूनही विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा गटाचे पहिल्या यादीतील अन्य उमेदवार –
संजय दिना पाटील-ईशान्य मुंबई
खा. अरविंद सावंत – मुंबई दक्षिण
अमोल कीर्तिकर – मुंबई वायव्य
चंद्रहार पाटील – सांगली
राजाभाऊ वाजे – नाशिक
खा. भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
ओमराजे निंबाळकर – धाराशिव
चंद्रकांत खैरे – संभाजीनगर
नागेश आष्टीकर – हिंगोली
मावळ संजोग वाघेरे-पाटील
संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम
प्राध्यापक नरेंद्र खेडेकर – बुलढाणा
संजय जाधव – परभणी