ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार

0

ठाणे – रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे घोडबंदर रोड, आर मॉल जवळील एम एम के हॉल मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे. सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी येथे बंजारा भवनासाठी ५००० चौ.फु. एवढी जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदार संघात बंजारा समाजभवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांच्या देखील नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे.

सदर मेळावा सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात पार पडणार असुन, ठाणे शहर व जिल्ह्यात बंजारा समाज बहुसंख्येने आहे. समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनाने हा मेळावा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. कारण ठाणे शहर, लोकमान्य नगर, किसन नगर, कापुरबावडी, मानपाडा, वाघबीळ, आझादनगर, ब्रहमांड, पातलीपाडा, बाळकुम, दिवा, मुंब्रा, कळवा, मिरा भाईंदर, नवी मुंबई भिवंडी शहर व तालुका, कल्याण डोंबिवली शहर व तालुका, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा अशा वेगवेगळ्या भागात गोर बंजारा समाज स्थानिक रहिवाशी म्हणून बहुसंख्येने वास्तव्यास आहे. तरी देखील मोजकेच सरकारी नोकर वर्ग वगळता उर्वरित समाज हा मोलमजुरी करून खातो. अशा समाजाची प्रगती होणे गरजेचे आहे. ठाणे जिल्यात मोठ्या प्रमाणात राहणारा बंजारा समाज फक्त मतदानासाठी मर्यादित नसून सतेत भागीदारी घेण्यासाठी सज्ज आहे. म्हणून काही प्रलंबित प्रश्न सुटणे महत्वाचे आहे.

ज्या बंजारा समाजांनी महाराष्ट्राला महानायक वसंतराव नाईक आणि जलनायक सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन यशस्वी मुख्यमंत्री दिले. आणि उभ्या महाराष्ट्राचा विकास साधला. अशा बंजारा समाजाला आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत लोकसंख्येच्या हिशोबाने राजसतेचा वाटा मिळायला पाहिजे, बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, बंजारा नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला पाहिजे. तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचा लाभ शहरी भागातील तांड्याला झाला पाहिजे. सरकारच्या वतीने ठाणे जिल्यात शासकीय भूखंडावर बंजारा सांस्कृतिक भवन बांधण्यात यावा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने असलेल्या ठाणे रोड वरती ‘महानायक वसंतरावजी नाईक महामार्ग ‘अशा आशयाचा मोठा फलक लावण्यात यावा. गोरबोली बंजारा भाषेला संविधानाच्या ८ व्या सूचित समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी. विश्व कल्याणकारी प्रार्थना करून संबंध मानव जातीला परोपकारी जीवन जगण्याचे संदेश देणारे, जी भविष्यवाणी केली ती तंतोतंत खरी ठरत आहे असे संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त १५ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करून सेवालाल महाराज यांचा सन्मान करण्यात यावा. असे बहू उ‌द्देश घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजय राठोड, खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थितीत असणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज, बंजारा नेते श्री किसनभाऊ राठोड, शंकरशेठ पवार, विलासभाऊ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद, महासचिव पंडितभाऊ राठोड यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित असणार आहे. अशी माहिती संयोजक श्री अनिल राठोड यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech