ठाणे – महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त

0

ठाणे – ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ६११ नळ जोडण्या खंडित केल्या असून ३० मोटर पंप जप्त केले आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech