फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला का ?

0

शिंदेला संपवून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का?

सत्य समोर येण्यासाठी एन्कांऊटरची न्यायालयीन चौकशी करावी-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

मुंबई – बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पोलीस अधिका-याची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि स्वतःवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय पण या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत या प्रकरणाची चौकशी चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झालीच पाहिजे होती याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिस अधिका-याची बंदूक हिसकावून घेऊन आरोपी गोळीबार करतो ही बाब अत्यंत गंभीर आहे.

या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
१. पोलीस अधिकारी इतके बेसावध आणि निष्काळजीपणे आरोपींना घेऊन जातात का ?
२. एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या तरी आदेशावरून त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे का ?
३ . फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?
४. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?
५. पोलीस कस्टडीत आरोपींना संपवून प्रकरण दाबण्याचा उत्तरेतील राज्यातला पॅटर्न महाराष्ट्रात आणला जात आहे का ?

अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनीही पोलिसांनी पैसे घेऊन त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी केली पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech