3 हजार कोटींना गोपाळपूर बंदर अदानीने घेतले विकत

0

अहमदाबाद – गेल्या दहा वर्षांत झपाट्याने प्रगती करून देशातील उद्योग जगतात जबरदस्त मुसंडी मारणार्‍या अदानी उद्योग समूहाने आता भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार मानले जाणारे ओडिशातील गोपाळपूर बंदरही विकत घेतले आहे. यासाठी अदानीने तब्बल 3,080 कोटी रुपयांचा सौदा केला आहे. देशात ये-जा करण्यासाठी असलेले बहुतेक सगळे हवाई आणि सागरी प्रवेशमार्ग अदानीच्या ताब्यात आहेत. त्यात आता गोपाळपूरची भर पडली आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या अदानी उद्योग समूहातील कंपनीने गोपाळपूर पोर्ट्स लिमिटेड (जीपीएल) या कंपनीतील एस पी ग्रूपचा 56 टक्के, तर ओरिसा स्टीव्हडोअर्स लिमिटेडचा 39 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठीचा सामंजस्य करार केला आहे. हा सौदा एकूण 3,080 कोटी रुपयांचा आहे.

भारताच्या पूर्व किनार्‍यावर वसलेले गोपाळपूर हे रस्ते आणि रेल्वे मार्गांनी जोडले गेलेले भारतातील एक महत्त्वाचे बंदर आहे. गोपाळपूर बंदराची हाताळणी क्षमता खूप मोठी आहे. ओडिशा सरकारने 2006 मध्ये जीपीएल कंपनीला तीस वर्षांच्या करारावर हे बंदर कंत्राटावर दिले होते. करारामध्ये दर दहा वर्षांनी बंदराचा विस्तार करण्याची तरतूद आहे. लोह, खनिज, दगडी कोळसा, चुनखडी, इल्मेनाईट आणि अ‍ॅल्युमिनियम अशा खनिजांची वाहतूक करणारी मोठी जहाजे या बंदरातून ये-जा करतात. भारतातील खनिजांशी संबंधित उद्योग क्षेत्राला कच्चा माल पुरविण्यामध्ये गोपाचपूर बंदर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech