ठाणे : ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले नियुक्त केलेले विभागप्रमुख असलेले विक्रम गणपत मोरे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 79 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम मोरे व 2 मुले संतोष आणि महेश यांच्यासह नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चंदनवाडी आणि खोपट परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विक्रम गणपत मोरे (भाऊ) हे ठाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या कार्यकाळातील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून खोपट परिसरात कार्यरत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विक्रम मोरे यांना पहिले विभागप्रमुख म्हणून 1974 साली नियुक्त केले होते. खोपट परिसरातील पहिली शिवसेना शाखा विक्रम मोरे यांनी सुरू केली. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या अनेक चळवळी, आंदोलने, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. 1974 साली त्यांनी खोपट विभागातून ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर 1986 साली पुनः ठाणे महानगर पालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. तर 2004-05 साली ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते.
चंदनवाडी शिवसेना शाखेतही त्यांचा वावर होता. चंदनवाडी गणेश सेवा मंडळच्या गणेशोत्सव आणि नवरात्रौ उत्सव यामध्येही त्यांचा सहभाग असायचा. राजकारण आणि समाजकारण बरोबरच आपल्या भावकी आणि गावकीसाठी त्यांनी योगदान दिले. ठाणे शहरात खेड तालुका रहिवासी संघाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असायचे. चंदनवाडी परिसरात माजी नगरसेवक रघुनाथ मोरे, दत्ताराम मोरे, शिक्षण मंडळ सभापती हरिभाऊ पाष्टे, माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यकाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाने विक्रम मोरे यांनीही ठाण्यात शिवसेनेची बीजे पेरली, वाढवली. अनेक निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत ठाण्यातील शिवसेनेचा गड मजबूत केला. त्यांच्या निधनाने चंदनवाडी आणि खोपट परिसरात शोककळा पसरली असून जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जुने जाणते शिवसैनिक, आजी माजी नगरसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.