(टीम ठाणेकर)
ठाणे- ठाण्याच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजु महिला रुग्णांवर रोबोटिक मशिनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडु फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नविन रोबोटीक तंत्रज्ञानाचे तसेच, गंगुबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काऊंटर नसलेले गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात तब्बल १२ कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशिन नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. या मशिनद्वारे बदलापुर येथील पुष्पा केदारे ५० वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. केदारे यांना गेल्या तीन वर्षापासुन संधीवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्रास होत होता.तर, भिवंडीच्या बेबी गायकवाड ६६ वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकाच्या संदर्भाने गंगुबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भुलतज्ज्ञ डॉ.अक्षय राऊत, अस्थीतज्ज्ञ डॉ. सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्या. याकामी रोबोटीक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक साह्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले.
रोबोटीक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागला. एरव्ही मॅन्युअली ऑर्थोपेडीक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशिनद्वारे केलेल्या शस्त्रकियेमध्ये टाळता येतात. या मशिनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्त्राव देखील कमीतकमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले.
– रोबोट करतो अवघड शस्त्रक्रिया
गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णाच्या संपुर्ण शरीराचे सिटी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशिनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे तयारी केली जाते. रोबोट, पेन्डन्ट, ओटीएस, सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वतः ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. दोनच दिवसात रुग्ण चालु लागतो.
– डॉ.सचिन पांडे, ऑर्थोपेडीक सर्जन
– कॅशलेस रुग्णालयाचा गोरगरीबांना आधार
ठाण्यात गेली दोन वर्ष सुरू असलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये रुग्णाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिधापत्रिका धारक गरीब रुग्णांवर अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया तसेच सर्व औषधोपचार इथे मोफत केला जातो. नुकतेच दोन महिला रुग्णावर रोबोटीक शस्त्रक्रिया करून गुडघ्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
– डॉ. जालंदर भोर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कै.गंगुबाई शिंदे रुग्णालय.