मुंबई – अनंत अंबानी यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेतला गेला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक मानले जाते. दरवर्षी लाखो भक्त मंडळाच्या गणेशोत्सवात सहभागी होतात. अंबानी कुटुंबीय यातील महत्त्वाचे योगदान देणारे आहेत.
अंबानी कुटुंबाचे मंडळाशी असलेले दीर्घकाळचे नाते आणि त्यांच्या सामाजिक योगदानामुळे ही नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जाते. गेल्यावर्षी अनंत अंबानी यांनी स्वतः कोट्यवधी रुपयांचा निधी मंडळाला दान केला होता. यावर्षीही त्यांनी मोठी देणगी दिल्याचे वृत्त आहे. या देणग्या आणि मदतीमुळे मंडळाला समाजकार्य करण्यास मोठा हातभार लागला आहे. मंडळामार्फत रुग्ण सहाय्य निधी योजना, गरजू व्यक्तींना मदत, आणि डायलिसिस मशीनची स्थापना यांसारख्या उपक्रमांमध्ये अंबानी कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. या नियुक्तीमुळे मंडळाची प्रतिमा वाढेल आणि त्यांच्या समाजकार्यात अधिक प्रभावीपणा येईल, अशी अपेक्षा आहे. अनंत अंबानी यांच्या सहभागामुळे लालबागचा राजा मंडळाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असे मंडळाचे पदाधिकारी मानत आहेत.