श्रींच्या आगमनाची चाहूल, बाजारातील दुकाने सजली

0

मुंबई – सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला केवळ चार दिवस उरले आहेत. घरोघरी स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी होत असलेल्या गणेशस्थापनेचा उत्साह बाजारातही संचारला आहे. सजावटीपासून तर वस्त्रालंकाराची दुकाने सजल्याने बाजारपेठांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशमूर्तीसाठी बाजारात सध्या सर्वात जास्त लगबग दिसून येत आहे. गणेशमंडळांच्या मूर्तीची रंगरंगोटी शेवटच्या टप्प्यात असून घरगुती मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम गणेशमूर्तीसह इतरही साहित्यांवर झाला आहे. असे असले तरी गणेशासोबतच तिसऱ्या दिवशी गौरीचेही आगमन होत असल्याने गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे.

गणेशोत्सवासाठी सजावटीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. रेडिमेड फुलांचे व धाग्यांच्या मखरांना सर्वाधिक मागणी आहे. ९०० रुपयांपासून तर ५ हजारांपर्यंतचे मखर बाजारात उपलब्ध आहेत. सनफ्लॉवर, ब्लॉसम, ऑर्गेन्झा, ऑर्चिड, लीफस्टिक आदी प्लॅस्टिक फुलांसह विविधरंगी ओढण्याचा उपयोग करून तयार होणारे हे मखर उघडून ठेवता येत असल्याने वापरणे सोयीचे जाते.गणेशोत्सवात सजावटीमध्ये विविधरंगी प्रकाशमाळांची मोठी मागणी असते. बाजारात २० रुपयांपासून तर ५०० रुपयांच्या सिरीज उपलब्ध आहे. सोबतच चेहऱ्यावर थेट प्रकाश सोडणारे एलईडी लाईट, गोल फिरणारे विविधरंगी लाईटची मागणी होत असल्याचे विक्रेते सांगतात.गणेशमूर्तीत नवीन काय याचाही शोध अनेक जण घेत असतात. चितारओळीत विविधरंगी सोवळे, फेटा, पगडी, शेला परिधान केलेल्या श्रींच्या आकर्षक मूर्ती सध्या सर्वाचे लक्ष्य वेधून घेत आहेत. या मूर्तीची सुरुवातच ३ हजारांवर असून १० ते १५ हजारांपर्यंत सजावट केलेल्या मूर्ती विक्रीस उपलब्ध असल्याचे विक्रेते सांगतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech