वक्फ बोर्ड घोटाळ्यात आपचे अमानतुल्ला खानला ईडीकडून अटक

0

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. तत्पूर्वी ईडीने आज, सोमवारी सकाळी अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकला होता. तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले होते. अमानतुल्ला यांनी सुरुवातीला ईडीच्या पथकाला घरात येऊ दिले नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सकाळी जेव्हा ईडीच्या पथक अमानतुल्ला खान घरात प्रवेश देत नव्हते तेव्हा दिल्ली पोलिसांच्या पथकाला तिथे बोलवण्यात आले. पोलिसांनी अमानतुल्ला खान यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला घरात येऊ द्यायचे नसेल तर तुम्ही घराबाहेर येऊन तपासात सहकार्य करा, असे पोलिसांनी सांगितले. मात्र खान यांनी घरात आजारी सासू असल्याचे सांगत वाद सुरुच ठेवला. माझ्या अटकेनंतर माझ्या सासूचा मृत्यू झाला तर तुम्ही जबाबदारी घ्याल का..? असे खान म्हणाले. त्यानंतर ईडीचा एक अधिकारी तुम्ही मोठ्या आवाजात बोलून तुमच्या सासूला त्रास देत आहात असे म्हणाला. त्यानंतर बऱ्याच वादावादीनंतर अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केला. अनेक तास झडती घेण्यात आली, सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर खान यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ईडीने अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 2016 मध्ये अमानतुल्ला खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग उघडकीस आल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला. अमानतुल्ला खान हे पूर्वी दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना त्यांनी बोर्डावर 32 जणांची नियुक्ती केली ज्यासाठी कोणतेही नियम पाळले गेले नाहीत आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वे बाजूला ठेवली गेली. या 32 जणांच्या नियुक्तीद्वारे त्यांनी बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथील अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या होत्या, असाही आरोप करण्यात आला होता. बेकायदेशीररीत्या भरती झालेल्या 32 लोकांपैकी 5 जण खान यांचे नातेवाईक आहेत. तर इतर 22 जण त्यांच्या ओखला मतदारसंघातील आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडी दोघांनीही गुन्हा दाखल केला आहे. ईडीने 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तर सीबीआयने 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech