खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा झंझावाती जनसंवाद दौरा, शेतकरी आणि महिलांचा कल्याणकारी योजनांना चांगला प्रतिसाद
नाशिक – जनसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी जळगावमध्ये ८ विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश, तळागाळातील शिवसैनिकांची फळी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण योजना, अन्नपूर्णा योजना अशा योजनांना महिला आणि शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रे दरम्यान नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज नाशिकमधील देवळाली, निफाड, इगतपुरी अशा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला.
निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या रणनितीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महत्वाच्या सरकारी योजना जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील काही लाभार्थींशी काल संवाद साधला. महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्यांदा सरकारने आमच्याबद्दल विचार केला आणि दरमहा १५०० रुपये देण्याचे काम केले. यामुळे महिला खूश असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळागाळात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. याचा लेखाजोखा लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाईल, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून येईल यासाठी प्रत्येक पक्ष ताकदीने प्रयत्न करेल. उमेदवार निवड पक्ष श्रेष्ठी करतील, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षांच्या काळात घरात बसून विकासकामांना खो घालणारे आता प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत आहेत, अशी घणाघाती टीका डॉ. शिंदे यांनी केली. गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने केलेली विकासात्मक कामे आणि जनकल्याण योजनांना मिळणारा नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांना भीती वाटायला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत गैरसमज पसरवून मते मिळवली मात्र आता विधानसभेत ते होणार नाही, त्यामुळे विरोधक प्रत्येक गोष्टीवर राजकारण करत आहे, असे ते म्हणाले.