मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात लोकसभा निवडणुकीसोबतच व्यापक आघाडीवर चर्चा झाली. अमित शहांसोबत चर्चा केल्यानंतर राज मुंबईत परतले. युतीबद्दलचा निर्णय, पुढील चर्चा राज्य पातळीवरच होईल असं भाजपकडून त्यांना सांगण्यात आलं. यानंतर ताज लँड्स एन्डमध्ये राज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या बैठकीत राज यांना शिवसेना, भाजपकडून तीन प्रस्ताव देण्यात आले.
मनसे आणि शिवसेनेचं विलिनीकरण करुन शिवसेनेचं अध्यक्षपद तुम्ही घ्या, अन्यथा लोकसभेला पाठिंबा द्या, त्याबदल्यात विधानसभेला सन्मानजनक जागा घ्या किंवा मग लोकसभेला एक-दोन जागा घ्या, पण मग विधानसभेला कमी जागा मिळतील, असे तीन प्रस्ताव राज यांना शिवसेना, भाजपकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे. मनसे आणि शिवसेनेचं विलिनीकरण करुन राज यांना प्रमुखपद देण्याच्या प्रस्तावाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मी शिवसेना किंवा मनसेचा प्रवक्ता नाही. त्यामुळे मी या विषयावर उत्तर देऊ शकणार नाही. असा कुणाचा पक्ष कुणाकडे जात नसतो, असं फडणवीस म्हणाले. मनसेला महायुतीत सामावून घेण्यासाठी आमची चर्चा सुरू असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.