डोंबिवली – डोंबिवलीतील होतकरू युवक विशाख कृष्णस्वामी, जो ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत आहे, आता चायनाचा २३५ दिवसांचा धावण्याचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विशाक 245 पेक्षाही जास्त दिवस सतत धावण्याचे ध्येय ठेवले आहे. या साहसी ध्येयाने प्रेरित होऊन विशाखने भारताचे नाव जागतिक पातळीवर उमटवण्याचा निर्धार केला आहे.
विशाखच्या या प्रयत्नांत एक महत्त्वाचा अडथळा आला, जेव्हा त्याला आर्थिक पाठबळाचा अभाव आणि वडिलांचे छत्र हरपल्याने आपला सराव बंद करावा लागणार होता. मात्र, ही बाब कल्याण मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कानावर गेली. डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी विशाखला १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले, ज्यामुळे त्याच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली.
विशाख यापूर्वीच दोन विश्वविक्रम आपल्या नावावर कोरले आहेत. पहिला विक्रम त्याने ६१ दिवस ४५ किलोमीटर धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करत तोडला. याशिवाय आणखी एक विक्रम करून त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. आता, चायनाचा २३५ दिवसांचा विक्रम मोडण्यासाठी विशाख विविध अडचणींवर मात करत धावणार आहे.
विशाखला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते, पण त्याची कामगिरी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नजरेतून सुटली नाही. डोंबिवली क्रीडा संकुलात धावत असताना त्यांनी विशाखकडे विचारपूस केली आणि त्याच्या धडाडीने प्रभावित झाले. त्यांनी विशाखला प्रसिद्धीस आणण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे विशाखचे नाव सर्वांना परिचित झाले. विशाख आता ६०० दिवस धावण्याचा मानस ठेवून तयारी करत आहे, आणि त्याच्या या अविश्वसनीय प्रयत्नांसाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची आणि त्याला पुढे धावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असेही शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.