नवी दिल्ली – मलेशियात उदार शक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी 10 ऑगस्ट 2024 रोजी भारतात परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव पाच ते नऊ ऑगस्ट 2024 या कालावधीत मलेशियातील कुआंतान इथे पार पडला. या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग घेतला.
या सरावादरम्यान भारतीय हवाई दलाची Su-30MKI लढाऊ विमाने ही रॉयल मलेशियन हवाई दलाच्या Su-30MKM या लढाऊ विमानांसोबत सहभागी झाली ज्यामुळे दोन्ही हवाई दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कार्यपद्धतीतील नियमांची ओळख होऊन समन्वयाने काम करण्याच्या क्षमतेत वाढ झाली. तसेच Su-30 या लढाऊ विमानांच्या परिचालनातील कार्यक्षम वाढवण्याच्या उद्देशाने दोन्ही हवाई दलातील तंत्रज्ञान विषयक तज्ञांनी एकमेकांच्या देखभाल कार्यपद्धती जाणून घेतल्या.