बंगळुरू – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही ट्रोलिंगला बळी पडावं लागलं आहे. बंगळुरू येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या २१ व्या द्वीवार्षिक राज्य स्तरीय परिषदेत बोलत असताना चंद्रचूड यांनी हा प्रसंगातून व्यथा मांडली. याच परिषदेत त्यांनी काम आणि वैयक्तिक आयुष्याची सांगत घालत असताना तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबतही मत व्यक्त केले.
चंद्रचूड म्हणाले की, न्यायाधीशांच्या आणि विशेष करून जिल्हा न्यायाधीशांच्या कामात तणावाचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची बाब आहे. हे सांगत असताना त्यांनी स्वतः बरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. एका महत्त्वाच्या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होते, त्यावरून मला ट्रोल करण्यात आले. “चार-पाच दिवसांपूर्वीचाच हा प्रसंग आहे. सुनावणीसाठी खंडपीठ बसले होते. माझी कंबर थोडी भरून आल्यामुळे मी थोडा सावरून बसलो. माझ्या खुर्चीवर माझ्या बसण्याची स्थिती बदलली. एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं गेलं”, अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.