नवी दिल्ली – ऑकलंडमधील भारतीय समुदायाची बऱ्याच काळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार असल्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. भारत-न्यूझीलंडचे राजनैतिक संबंध अधिक वृध्दींगत करण्यात वाणिज्य दूतावास महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यूझीलंड दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात राष्ट्रपती मुर्मू यांनी ऑकलंडमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसेच खासदार सौमित्र खान आणि जुगल किशोर उपस्थित होते. या समारंभानंतर राष्ट्रपती त्यांच्या तीन देशांच्या अंतिम टप्प्यात तिमोर-लेस्टेला रवाना झाल्या.
न्यूझीलंडच्या विविध भागातून या कार्यक्रमासाठी अतिशय उत्साहाने ऑकलंड येथे आलेल्या भारतीय समुदायातील सदस्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रपतींनी न्यूझीलंडच्या विकास आणि समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. व्यवसायापासून ते शिक्षण, आरोग्यसेवेपासून तंत्रज्ञानापर्यंत त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. राष्ट्रपतींनी भारतीय समुदायाची समर्पित वृत्ती, परिश्रम आणि सृजनशील वृत्तीचे कौतुक केले. या मूल्यांनी अनेक पिढ्यांपासून आपल्याला मार्गदर्शन केले आहे आणि भविष्यातही ती आपल्याला प्रेरणा देत राहतील.
भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय संबंधांची झपाट्याने होणाऱ्या प्रगतीला विचारात घेऊन राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, उच्चस्तरीय भेटी आणि शिष्टमंडळांच्या देवाणघेवाणीमुळे दोन्ही देशांमधील सामंजस्य वाढण्यास आणि सहकार्याचे नवीन मार्ग खुले होण्यास हातभार लागला आहे. भारतीय समुदायाची भरभराट आणि समृद्धीला हातभार लावणाऱ्या न्यूझीलंडच्या सरकारची आणि जनतेची त्यांच्या समावेशक आणि आतिथ्यशील वृत्तीबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. राष्ट्रपती म्हणाल्या की, विकसित भारताच्या उभारणीच्या प्रवासात आपण जगभरातील भारतीय समुदायाला प्रमुख भागीदार म्हणून पाहात आहोत. भारतीय समुदायाचे कौशल्य, कसब आणि अनुभव भारताच्या प्रगतीसाठी मौल्यवान आहेत.