मुंबई – “भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे”, अशी सूचना अजित पवार गटाने त्यांच्या चिन्हाखाली लिहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असून, आगामी निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार गट वापरू शकणार आहे. तर, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. असे निर्देश देत असताना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला त्यांच्या चिन्हाखाली एक टिप्पणीही लिहायला सांगितली आहे. यावरून रोहित पवार गटाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.
या सूचनेवरून रोहित पवारांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता अंदाज येतोय.