ठाणे – खादी वस्त्रांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार, प्रसार व वापर वाढावा, यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्रीच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन खादी वस्तूंची खरेदी करावी तसेच वस्त्रांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, ठाणे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खादी वस्त्र विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलला ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी भेट देऊन तेथील वस्तूंची पाहणी केली. त्यांनी या स्टॉल वरील काही वस्तूंची खरेदीही केली.
खादी वस्त्रांसोबतच या स्टॉलवर मध संचालनालय, महाबळेश्वर येथील अँगमार्क असलेले मधुबन हनी सुद्धा विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी खादी ग्रामोद्योगच्या स्टॉलला भेट देऊन तेथील वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे.