भिवंडीतून तब्बल ८०० किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त!

0

ठाणे –  गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील भिवंडी-वाडा मार्गावर एका अज्ञात ठिकाणी सुरू असलेल्या मेफेड्रोन उत्पादन युनिटवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८०० किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात ८०० कोटी रुपयांपर्यंत किंमत आहे. ही कारवाई केवळ स्थानिक गुन्हेगारीचा मुद्दा नसून, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कच्या मुळावर घाला घालण्याचे एटीएसचे ध्येय आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद युनुस शेख आणि त्याचा भाऊ मोहम्मद आदिल शेख या दोन आरोपींनी आठ महिन्यांपूर्वी भिवंडीत एक फ्लॅट भाड्याने घेऊन मेफेड्रोन तयार करण्याचे काम सुरू केले होते. पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरलेल्या या बंधूंनी आता लिक्विड स्वरूपात मेफेड्रोन बनविण्यात यश मिळवले होते. ५ ऑगस्ट रोजी एटीएसने या युनिटवर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.

गुजरात एटीएसने भरुच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही धाड टाकून ३१ कोटी रुपयांचे लिक्विड ट्रामाडोल जप्त केले. या कारवाईत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी १८ जुलै रोजी पलसाणा येथे ५१ कोटींच्या कच्च्या मालासह तीन जणांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख बंधूंचे नाव उघड झाले. ही कारवाई ड्रग्ज विरोधी मोहिमेचा भाग असून, अशा गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई करून समाजात सुरक्षिततेचा संदेश दिला जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech