घाटकोपर होर्डिंगचे शुल्क 21.94 लाखांची थकबाकी

0

मुंबई –  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सद्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या भावेश भिंडे यांच्या मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एप्रिल 2024 पासून होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत 21.94 लाख रुपयांची थकबाकी अदा न केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपर आणि दादर येथील होर्डिंगचे अदा केलेले आणि प्रलंबित भाड्याची माहिती विचारली होती. मुंबई रेल्वे पोलिसांनी तब्बल एका महिन्यानंतर अर्जास उत्तर देत थकबाकी रक्कमेची माहिती दिली. जून 2022 पासून मार्च 2024 पर्यंत मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2 कोटी 81 लाख 74 हजार 29 रुपये अदा केले. प्रति महिना 13,31,200 असे शुल्क होते. मार्च 2024 चे शुल्क 10 लाख रुपये दोन धनादेश द्वारा जमा केले. पहिला धनादेश 6 मे 2024 तर दुसरा धनादेश 7 मे 2024 चा होता. मार्च 2024 महिन्याचे 3 लाख 31 हजार 200 रुपये अदा केले नाही. एप्रिल 2024 चे शुल्कही अदा केले नाही. 13 मे रोजी होर्डिंग दुर्घटना होईपर्यंत एकूण 21 लाख 94 हजार 880 रुपये थकबाकी आहे.

दादरची थकबाकी 16 लाख : दादर रेल्वे वसाहत येथील होर्डिंगचे शुल्कही मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकविले आहे. फेब्रुवारी 2024 पासून 12 मे 2024 पर्यंतची थकबाकी 16 लाख 4 हजार 936 रुपये इतकी आहे. येथील शुल्क हे प्रति महिना 5 लाख 29 हजार 100 रुपये इतके होते.

अनामत रक्कम 40 लाख :  सुदैवाने मुंबई रेल्वे पोलिसांनी मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून घाटकोपर येथील होर्डिंगसाठी अनामत रक्कम 40 लाख आकारली होती. यामुळे एकूण 40 लाख अनामत रक्कम जमा आहे. दादर पोलीस वसाहत येथील होर्डिंगसाठी जमा असलेल्या अनामत रक्कमेची माहिती दिली नाही.

शुल्क अदा करण्यातही दिरंगाई :  मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे अदा करण्यात आलेल्या शुल्क रक्कमेचा धनादेश दिनांक लक्षात घेता शुल्क अदा करण्यात दिरंगाई होत होती. पण तरीही मुंबई रेल्वे पोलिसांनी प्रलंबित रक्कमेवर एकही दमडीचे व्याज आकारणी न करता मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मेहरबानी केली असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech