सीतापूर – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सीतापूर जेलमध्ये सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची सुमारे दीड तास भेट घेतली. आझम यांच्याबाबतीत अन्याय होत असून भाजपा सरकारने खोट्या खटल्यांचा रेकॉर्ड बनवला असल्याचा आरोप यादव यांनी भेटीनंतर केला. मात्र यादव यांची ही भेट राजकीय दृष्टीकोनातून होती, आझम यांच्या मान्यतेनंतरच रामपूरच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता आहे.
आझम यांच्या कुटुंबियांनाही त्रास होत असून हे अमानुष आहे. काळ बलवान आहे, काळ बदलत आहे, आझम यांना नक्की न्याय मिळेल अशी आपल्याला आशा आहे. भाजपाने खोटे खटले आझम यांच्या विरोधात दाखल केले असले तरी शेवटी विजय सत्याचाच होईल असे त्यांनी पुढे सांगितले.
भाजपा सरकार मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवत आहे, पण इलेक्टोरल बाँडमुळे भाजपाचेच सत्य बाहेर आले आहे. आता पीडीएच एनडीएला पराजित करेल. देशाची जनता निवडणूक तारखांचीच वाट पाहत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.