रत्नागिरी जिहयात चिपळूण येथे १८ ऑगस्टला चला करू या गणपती कार्यशाळेचे संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समिती आणि चिपळूणमधील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे येत्या १८ ऑगस्ट रोजी ‘चला करू या गणपती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शहरातील बेंदरकर आळी येथील रा. स्व. संघाचे माधव बाग येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संस्कार भारती वैविध्यपूर्ण कार्यक्रम करत असते. लहान मुलांना मातीचे गणपती कसे करतात, याची ओळख होण्यासाठी ‘चला करू या गणपती’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षक म्हणून संतोष केतकर, सुनील खेडेकर जबाबदारी सांभाळणार आहेत. या कार्यशाळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे यासाठी १० ऑगस्टपर्यंत प्रवेश शुल्कासह नावनोंदणी करणाऱ्यांनाच यामध्ये सहभागी होता येईल.
इयत्ता चौथीपासून पुढील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. यासाठी साने गुरुजी उद्यानाशेजारी असणाऱ्या अक्षर साहित्य येथे नावनोंदणी करावी. प्रशिक्षणार्थीना माती पुरविण्यात येईल. प्रशिक्षणाला येताना पाच इंच बाय अर्धा इंच आकाराचे पातळ लाकडी कोरणे प्रत्येकाने आणावे. कोरणे एक बाजूला सरळ व दुसऱ्या बाजूला तिरके असावे. १ फूट १ फूट आकाराचा जाड पुठ्ठा किंवा प्लायवूड येताना बरोबर आणावा. त्यावर मूर्ती तयार करायची आहे.
१८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सहभागी प्रशिक्षणार्थींनी हजर राहावे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ प्रशिक्षण चालेल. येताना जेवणाचा डबा व पाण्याची बाटली सोबत आणावी. मूर्तीचे रंगकाम २५ ऑगस्ट रोजी शिकविले जाईल. त्या दिवशी प्रत्येकाने पोस्टर कलर, रंग तयार करण्यासाठी डिश, पाण्यासाठी भांडे, १ आणि ८ नंबरचे ब्रश आणावे. रंगवून झाल्यावर प्रत्येकाला आपण केलेली मूर्ती घरी घेऊन जायची आहे.