भोपाळ – मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाला संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण शुक्रवार २२ मार्चपासून सुरू झाले. शुक्रवारचा दिवस असल्याने पहिल्या दिवशी मुस्लिमांना नमाज अदा करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र शनिवारपासून भोजशाला संकुलात सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. भोजशाला संकुलाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर परिसरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
भोजशाला संकुल परिसरात आजपासून खोदकाम करण्यास सुरुवात झाली. खोदकाम करणाऱ्या मजुरांची प्रवेशद्वारावर तपासणी करून मगच त्यांना आतमध्ये सोडल्यात आले. भोजशाला संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास मुस्लिम पक्षकारांचा विरोध आहे.१६ मार्च मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. त्यावर १ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.मात्र शुक्रवारी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होताच ते रोखण्यासाठी मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ती फेटाळली.
मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना कमालुद्दीन वेल्फेअर सोसायटीने ही याचिका दाखल केली होती.हिंदु फ्रंट फॉर जस्टीस या हिंदूंच्या संस्थेच्या वतीने गोपाल शर्मा आणि आशीष गोयल हे भोजशाला सर्वेक्षणादरम्यान दोन्ही दिवस हजर होते. मात्र मुस्लिमांच्या वतीने अब्दुल समद खाने हे शुक्रवारी उपस्थित नव्हते.ते आज शनिवार भोजशाला परिसरात आले. सर्वेक्षण सुरू असताना तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची उभय पक्षांच्या प्रतिनिधींना न्यायालयाने परवानगी दिली आहे.
भोजशाला संकुलात असलेली मौलाना मशीद हे खरेतर सरस्वती देवीचे मंदिर आहे. १०३४ मध्ये राजा भोजने संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी ही वास्तू बांधली होती,असे हिंदूंचे म्हणणे आहे. हा वाद अयोध्येतील राम जन्मभुमीसारखा जुना आहे.हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील हा तिढा सोडविण्यासाठी न्यायालयाने दर मंगळवारी हिंदू या ठिकाणी येऊन पूजा-पाठ करण्यास तर मुस्लीमांना दर शुक्रवारी नमाज पढण्यास परवानगी दिली होती. त्याला हिंदु फ्रंट फॉर जस्टीसने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात आव्हान दिले होते.या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने भोजशाला संकुलात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेश दिले. त्यानुसार २२ मार्चपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे.