हिमाचलमधील काँग्रेसच्या ६ आमदारांचा भाजपात प्रवेश

0

शिमला – हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या ६ आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या आमदारांमध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, इंदर दत्त लखनपाल, देवेंद्र भुट्टो, राजेंद्र राणा आणि चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. यावेळी ३ अपक्ष आमदारांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये आशिष शर्मा, केएल ठाकूर आणि होशियार सिंह यांचा समावेश आहे. आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार डळमळीत झाल्याचे म्हटले जात आहे.
हिमाचलचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘आज पक्षप्रवेश केलेल्या आमदारांमुळे भाजपा अधिक मजबूत होईल. राज्यातील काँग्रेस सरकार त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला, ज्यातून काँग्रेसविरोधातील जनतेचा रोष दिसून येतो.’
राज्‍यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी या ६ आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत बंडखोर ६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी ६ आमदारांना २९ फेब्रुवारी रोजी अपात्र ठरवले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech