मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारणार

0

रत्नागिरी –  नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीचा वापर इंधन म्हणून करण्याकडे कल वाढला असून ही हरित चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

इंधन म्हणून डिझेल-पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमती, त्यांचा मर्यादित साठा या सर्वांचा विचार करून नैसर्गिक वायूचा वापर करण्याकडे कल वाढू लागला आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात सीएनजीचा पुरवठा होऊ लागला. सुरुवातीला रत्नागिरीसह मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी सीएनजीचा पुरवठा केला जात होता. सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रदूषण रोखण्यात त्याची मदत होत आहे. तुलनेने तो स्वस्तही आहे. वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करण्याबरोबरच रत्नागिरी शहरापासून तो घरगुती वापरासाठी पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) पुरवला जाऊ लागला आहे. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस म्हणून त्याचा पुरवठा पाच वर्षांपासून होऊ लागला आहे. आता या पर्यावरणपूरक गॅसचे सेवाक्षेत्र व्यापक केले जाणार आहे.

याआधी जिल्ह्यात अशोका गॅस कंपनीकडून ही सेवा पुरवली जात होती. आता मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये आधीपासूनच ही सेवा पुरवणाऱ्या महानगर गॅस या मोठ्या कंपनीने आधीच्या सेवा पुरवठादार कंपनीचा ताबा घेतला आहे. नव्या महानगर गॅस कंपनीने जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्याने सीएनजी स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यातील ही नवी सीएनजी स्टेशन उभारण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांना स्वतःचे सीएनजी स्टेशन उभारण्याची संधी देताना ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत. खेड, चिपळूण, आरवली, लांजा (हातखंबा ते लांजा) आणि साखरपा अशा पाच ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech