ठाणे – पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात दि. ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा ही रोटरी कम्युनिटी क्लब, वडवली, अंबरनाथ या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता आयोजित केली आहे.
या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे तपशील, बारकावे व योजनेचा अर्ज कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे किंवा जे लाभार्थी यशस्वीरित्या शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांचे स्वः अनुभव व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहेत.
पशुपालकांनी कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्यातील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांना सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.