न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठरले राज्यातील पहिले “लोकराज्य-कनिष्ठ महाविद्यालय”

0

ठाणे – “लोकराज्य” या शासनाच्या मुखपत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचलित न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने याविषयी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थेचे अध्यक्ष आर.एस.आपटे, सचिव आल्हाद जोशी आणि उपसचिव बी.एस.तुरुकमाने यांनी या कनिष्ठ महाविद्यालयातील इ. 11 वी व 12 वी च्या 250 विद्यार्थी-विद्यार्थिनींना “लोकराज्य” मासिकाचे सभासद बनवून या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. आणि या निर्णयास मूर्त स्वरूप देण्यासाठी या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किरणकुमार चव्हाण व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अशा प्रकारचे सदस्यत्व “लोकराज्य” मासिकाचे सदस्यत्व स्वीकारणारे हे कनिष्ठ महाविद्यालय आर्थिक वर्ष 2024-25 मधील महाराष्ट्र राज्यातील पहिले कनिष्ठ महाविद्यालय ठरले आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ठाणे, ही ठाण्यातील एक जुनी नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. 1926 साली न्यू इंग्लिश स्कूल, 1936 मध्ये न्यू गर्ल्स स्कूल, 1956 भारत नाईट स्कूल, 1975 इंग्लिश मीडियम स्कूल, 2011 – सीबीएससी स्कूल (1), 2022 – सीबीएससी स्कूल (2) या शाळांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे 98 वे वर्ष सुरू असून पुढील दोन वर्षांनी संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.

संस्थेतील विद्यार्थी हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करताना महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती व्हावी, शासनाकडून जनतेसाठी कशा प्रकारचे निर्णय राबविले जातात, याची माहिती होण्यासाठी या मासिकाचे वाचन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास संस्थेचे सचिव आल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील इतर शाळा व महाविद्यालयांनाही लोकराज्य मासिकाचे सभासद होण्यासाठी आवाहन केले आहे. या कनिष्ठ महाविद्यालयास येत्या दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी “लोकराज्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech