एसटीच्या प्रत्येक आगारात होणार उत्कृष्ट कामगारांचा गुणगौरव…!

0

मुंबई – १ ऑगस्ट,२०२४ पासून एसटीच्या २५१ आगारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या ५ चालक, ५ वाहक, ५ यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा आगार पातळीवर दररोज गुणगौरव करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळात सध्या ८८ हजार पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा देणे, तिकीट विक्रीतून उत्पन्न वाढविणे, इंधन बचतीतून खर्च कमी करणे आणि गाडीची सुयोग्य देखभाल ठेवून तांत्रिक दृष्ट्या निर्दोष गाडी मार्गस्थ करणे. ही महत्त्वाची कामे प्रामुख्याने चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी करत असतात. किंबहुना त्यांच्या कामगिरीच्या जीवावर एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे.

अशा कामगारांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी आगारात दररोज उत्कृष्ट काम करणाऱ्या ५ चालक, ५ वाहक, ५ यांत्रिकी कर्मचारी यांचा सत्कार करावा, असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

कर्मचारी दैनंदिन काम करत असतांना, त्यांच्या चांगल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक संदेश जाऊ शकतो आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळू शकते हाच उपक्रमाचा उद्देश आहे असे प्रतिपादन डॉ. माधव कुसेकर यांनी यावेळी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech