नवी दिल्ली: मागील तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. दिल्लीत असलेल्या भोसलेंना दोन दिवस केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट मिळाली नव्हती. अखेर काल रात्री उशिरा त्यांची शहांसोबत भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उदयनराजे भोसले उत्सुक आहेत. पण इथला विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा सांगितला. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याचं निश्चित मानलं गेलं. राष्ट्रवादीनं उदयराजेंना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. पण भोसलेंनी राष्ट्रवादीची ऑफर फेटाळून लावली.
सातारच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून तळ ठोकून होते. अखेर त्यांना काल अमित शहांची भेट मिळाली. साताऱ्यातून कमळ चिन्हावरच निवडणूक लढवायची असल्याचा ठाम निर्धार भोसलेंनी शहांकडे बोलून दाखवला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायचं नसल्याचं त्यांनी शहांना स्पष्टपणे सांगितलं. शहांनी राजेंना सकारात्मक प्रतिसाद दिला.