ठाणे – केंद्रीय मंत्रीमंडळाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाला (पीएम-जनमन) मंजुरी दिली. विशेषतः वंचित आदिवासी समुहाच्या (पीव्हीटीजी) (कातकरी, कोलम व मारिया गोडं) सामाजिक-आर्थिक परिस्थतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशन सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत असून ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १ मोबाईल मेडिकल युनिट मुरबाड व शहापूर तालु्क्यात सुरू असून, ०९ मोबाईल मेडिकल युनिट १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
“मोबाईल मेडिकल युनिट” उपक्रमातंर्गत ठाणे जिल्ह्यात ८१ दुर्गम अणि अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १० मोबाईल मेडिकल युनिट तयार करण्यात आले आहेत. मोबाईल मेडिकल युनिट हा प्रकल्प सेवा पुरवठादार मार्फत चालवण्यात येत असून प्रकल्पाअंतर्गत दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील लोकांकरीता या मोहिमेअतंर्गत १८ प्रकारचे औषध व १२ प्रकारचे प्रयोगशाळा तपासणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पाअंतर्गत मुरबाड तालुक्यात ३, शहापुर तालुक्यात ३, भिवंडी तालुक्यात २, अंबरनाथ तालुक्यात १ व कल्याण तालुक्यात १ असे एकूण १० मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटद्वारे गावामध्ये आरसीएच, लसीकरण, सिकलसेल रोग, औषधे आणि निदान एनसीडी इत्यादी सर्व आरोग्य सेवा रुग्णांना गावात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, लॅब टेक्नीशियन व र्फोमासिस्ट असे एकूण ४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
दि. १ जुलै ते २३ जुलै दरम्यान शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील मोबाईल मेडिकल युनिट मार्फत ३८ अदिवासी व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यात आल्या असून एकूण ३ हजार २६६ विविध आरोग्य सेवा रुग्णांना देण्यात आल्या आहेत.