शर्यतीमधून ते बाजूला गेल्याची चर्चा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा
ठाणे – माजी खासदार सहस्त्रबुद्धे हे भाजपा केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. भाजपाच्या विचारवंताच्या फळीतील ते एक आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये ठाणे मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला तर माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, आ. संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत होती. त्यामध्ये एक नंबरवर सहस्त्रबुद्धे हे होते. त्यांनी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे विभागवार मेळावे देखिल घेतले होते. दिल्लीमध्ये हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा याकरिता फिल्डिंगही लावली होती. या लोकसभा मतदार संघातील जाहीरनामा तयार करण्यासाठी मतदारांच्या सूचना देखिल मागविण्यात आल्या होत्या.
ठाणे लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे आता लोकसभा निवडणुकीत राजस्थानच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी या शर्यतीमधून ते बाजूला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
या मतदार संघाचा महायुतीच्या चर्चेत कोणताही निर्णय झाला नाही. त्यापूर्वीच सहस्त्रबुद्धे यांची आज केंद्रीय समितीने राजस्थानच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे तसेच तत्काळ त्यांनी कामाला लागावे, असे आदेश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्यामुळे त्यांना राजस्थान येथे निवडणूक होईपर्यंत थांबावे लागणार आहे, त्यामुळे ठाणे लोकसभा मतदार संघातील भाजपाचा एक दावेदार कमी झाला असल्याची चर्चा ठाण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.