नागपुर- केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी येत्या २७ मार्चला म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बुधवारी २७ मार्चला सकाळी ९ वाजता नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान एका भव्य रॅलीने ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. नागपूरला पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भाजपाकडून नागपूर मधून नितीन गडकरी यांचे नाव पहिल्याच यादीत घोषित न झाल्याने उलटसुलट चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांचे नाव घोषित करण्यात आले होते. नागपूरमधून काँग्रेसच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसून काँग्रेसचे विकास ठाकरे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे नागपुर मध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता असून वंचित बहूजन आघाडीने उमेदवार दिल्यास त्याचा फायदाही नितीन गडकरी यांनाच मिळण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी हे मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध मंत्री असल्याने त्यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे म्हटले जात आहे.