पुणे – आगामी लोकसभा निडणुकीसाठी आघाड्यांमधील घटक पक्ष उमेदवारांची नावे घोषित करीत आहेत. मात्र यापैकी अनेक जागांवर उमेदवाराचे नाव जाहीर होताच नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काँग्रेसने नुकतीच महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यावरही नाराजीचे सूर उमटले. पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर करताच ज्येष्ठ काँग्रेसी नेता आबा बागूल यांनी नाराजीचे बिगूल फुंकले. पुण्यात निष्ठेची हत्या असे व्हॉटसअॅप स्टेटस ठेवत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
चाळीस चाळीस वर्षे एकनिष्ठपणे काँग्रेससोबत राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे. ही परंपरा काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे सुरू आहे. ती जर अशीच सुरू राहणार असेल तर काँग्रेसचे अस्तित्वच पुण्यात शिल्लक राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीमध्ये असताना काँग्रेसने पंधरा वर्षे पर्वतीची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.आज पुण्यात काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे,असा घणाघाती हल्ला आबा बागूल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
पुण्याच्या जागेसाठी उमेदवाराची निवड करताना काँग्रेस जुन्या जाणत्या काँग्रेसी नेत्यांचे मत विचारण्याची तसदी काँग्रेसने घेतली नाही. उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी काँग्रेस पुण्यात केंद्रातून निरीक्षकही पाठविले नाहीत. काल परवा काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकर यांना उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली,असा शब्दात बागूल यांनी आपला संताप व्यक्त केला.