नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आज पहिल्यांदाच गुन्हेगारांच्या यादीत नाव सामील करून तेच दारू घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहेत, असा गंभीर आरोप ठेवला.
ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने केजरीवालना 28 मार्चपर्यंत 6 दिवसांची कोठडी दिली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते 26 मार्चला मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. केजरीवाल यांच्या अटकेवरून केंद्र सरकारच्या निषेधार्थ मुंबई, पुणे, दिल्लीसह देशभरात निदर्शने करण्यात आली.
ममता बॅनर्जी, शरद पवार यांनी आपण केजरीवाल यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभे राहू असे सांगितले. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
केजरीवाल यांना ईडीने आज दुपारी दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. केजरीवाल यांच्या विरोधात पुरेसे पुरावे सापडले असून, त्याची सत्यता तपासून अवैध पैशाचा प्रवास शोधण्यासाठी केजरीवाल यांना किमान दहा दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलाने न्यायालयात केली.
दारू घोटाळ्यात दक्षिणेकडील भारत राष्ट्रीय पार्टीच्या (बीआरएस) नेत्या के कविता, अन्य दारू माफिया आणि केजरीवाल यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणारा आणि सध्या ईडीच्या कोठडीत असलेला विजय नायर हा केजरीवाल यांच्यासाठी पैसे वसुली करीत होता, हे सिध्द करणारा पुरावा आपल्याकडे आहे, असा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला. त्यासाठी विजय नायरचा जबाब ईडीने सादर केला.