आयरा खानला कशाची सतावतेय भीती? लग्नाच्या 6 महिन्यांनंतर केल्या भावना व्यक्त

0

मुंबई – अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयराने तिच्या मनातील एक भीती बोलून दाखवली आहे. आमिरची आई आणि आयराच्या आजीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो आहेत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने यावर्षी जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं.

हा लग्नसोहळा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत चर्चेत होता. या दोघांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाली आहेत. आयरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या आयुष्यातील विविध गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने एका बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. आयराची आजी म्हणजेच आमिरच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करत आयराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयराने तिच्या मनातील एक भितीसुद्धा बोलून दाखवली आहे.

‘मला माहित आहे की या फोटोमध्ये बऱ्याच गोष्टी आणि बरीच लोकं आहेत. पण तुम्ही फक्त आजीच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रीत करावं अशी माझी इच्छा आहे. फक्त तिलाच पहा. केक कापायचा समारंभ पंधरा मिनिटांत उरकला. कारण जास्त वेळ उभं राहणं तिच्यासाठी दमछाक करणारं ठरू शकतं. जसजसं वय वाढतं, तसे शरीरात अनेक बदल होतात. त्यासोबतच एक भीती, अशक्तपणा असतो,’ असं तिने लिहिलंय.

या पोस्टमध्ये आयराने पुढे तिचे विचार मांडले आहेत. ‘वृद्धापकाळाकडे वळणं कसं असतं, याविषयीचे विचार अधूनमधून माझ्या डोक्यात येतात. तुमचे केस पांढरं होणारं वृद्धत्व नाही तर तुमच्या शरीरात पूर्वीसारखी ऊर्जा, तेज न राहण्याचं वृद्धत्व. जिथे आपण आपल्या सर्वच गोष्टींमधील क्षमता गमावू लागतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो की तेव्हासुद्धा मी माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकेन का? किंवा तोपर्यंत मी फक्त हालचालीच करू शकेन. पण तिच्या हास्याकडे पहा. या सगळ्यांतून ती चमकत होती. तीच खरी चमक आहे. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

आयराने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये आमिर खानचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नीसुद्धा फ्रेममध्ये दिसत आहेत. रिना दत्ता आणि तिची मुलं, त्याचसोबत किरण राव आणि तिचा मुलगासुद्धा या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. घटस्फोट झाला तरी आमिरचं त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीपूर्ण नातं आहे. आयरा ही आमिर आणि रिना दत्ता यांची मुलगी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech