मुंबई – टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाला मिळालेल्या बक्षिसी रकमेची सर्वत्र चर्चा होत आहे. बीसीसीआयने दिलेली बक्षिसाची रक्कम ही आयसीसीच्या बक्षिसी रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे अनेकांना 125 कोटींचा आकडा पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला. कारण गेल्या 11 वर्षात अनेक चढउतार पाहात टीम इंडिया आणि क्रीडा रसिकांना निराशा पचवली. त्यामुळे 11 वर्षानंतर मिळालेल्या जेतेपदाचं मोल काही वेगळंच आहे.
त्याची किंमत होऊ शकत नाही. यासाठी टीम इंडियावर सर्वच बाजूने बक्षिसाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. ही बक्षिसाची रक्कम संपूर्ण टीम आणि स्टाफला वाटली जाईल. त्याची वाटणी कशी होणार हे देखील ठरलं आहे. टीम इंडियात वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची निवड केली होती. तर चार खेळाडू राखीव होते. त्यात कर्णधार रोहित शर्माने संघात एकच बदल केला. सिराज ऐवजी संघात कुलदीप यादवला स्थान दिलं. त्यामुळे 8 सामन्यात संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि युझवेंद्र चहल यांना बेंचवर बसावं लागलं. मग आता या खेळाडूंना बीसीसीआयच्या बक्षिसातून किती रक्कम मिळणार असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की, वर्ल्डकपासाठी निवडलेल्या 15 खेळाडूंना समान रकमेचं वाटप होणार आहे.
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि युझवेंद्र चहल प्लेइंग इलेव्हनचा भाग नसले तरी त्यांना इतर खेळाडूंप्रमाणे 5 कोटींची रक्कम मिळणार आहे. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड यांना 5 कोटी रुपये मिळणार आहेत. द्रविड यांच्यासोबत कोचिंग स्टाफमध्ये असलेल्या प्रत्येकाला 2.5 कोटी रुपये मिळणार आहेत.इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2 कोटी मिळाले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाची निवड करणाऱ्या समिती सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षिसी रक्कम मिळणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून चार खेळाडू राखीव होते. या रिंकु सिंह, शुबमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांची निवड केली होती. त्यामुळे या खेळाडूंचा तसा काही संघाशी थेट संबंध नव्हता. पण हे खेळाडू संघातसोबत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सराव करताना दिसले होते. त्यामुळे या खेळाडूंच्या वाटेला काही आलं की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळणार आहेत.