मुंबई – मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकल सेवेवर झाला आहे. रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक अशा दोहोंवर पावसाचा परिणाम झाला आहे. पहाटे भांडुप, विक्रोळी स्टेशन या ठिकाणी पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरीचा मिलन सब-वे तसंच वरळीतल्या सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साठलं आहे.
मध्य रेल्वेनेही मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याचं स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून डाऊन मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या लोकल तसंच एक्स्प्रेस गाड्या आणि एलटीटीहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. यासंदर्भातली पोस्ट केली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर यांना पावसाचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना आज ऑफिस गाठताना हाल सहन करावे लागणार हेच पावसाची स्थिती सांगते आहे.
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.