डोंबिवलीत विजेच्या धक्क्याने पिसवली गावात सात जनावरांचा मृत्यू

0

डोंबिवली – डोंबिवली येथील पिसवली गावात पिंगारा बार परिसरात शुक्रवारी दुपारी विजेचा जिवंत प्रवाह गाई, म्हशी बांधलेल्या गोठ्यात प्रवाहित होऊन सात गाई, म्हशींचा आणि त्यांच्या वासरांचा जागीच मृत्यू झाल्याने गोधन मालकासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिसवली येथे मलिक यादव यांचा गाई, म्हशींचा गोठा आहे. या गोठ्या जवळ बदामाची मोठी झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या गावातून गेलेल्या विजेच्या खांबांवरील जिवंत वीज वाहिन्यांना स्पर्श करत होत्या. या फांद्या तुटून जीवंत वीज वाहिनीवर पडल्या तर वीज वाहिनी तुटण्याची शक्यता होती. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वीज पुरवठा बंद करून मलिक यादव यांच्या गोठ्या जवळील वीज वाहिनीला स्पर्श करणारी बदामाच्या झाडाची फांदी तोडली. अशाचप्रकारे पिसवली भागातील वीज वाहिनीला स्पर्श करणाऱ्या फांद्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या.

झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू केला. त्यावेळी जिवंत वीज वाहिनीतून वीज प्रवाह गोठ्याच्या छताच्या लोखंडी पाईप मधून प्रवाहित झाला. हा प्रवाह गोठ्यात प्रवाहित झाल्याने त्याचा धक्का गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशी, त्यांची दोन वासरे,एक गाय आणि गायीचे वासरू यांना बसला.धक्का बसताच हे गोधन जागीच मरण पावले. काही वेळाने गोधन मालक गोठ्यात आला. गोठ्यातील सर्व जनावरे मेली होती. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप गोधन मालक यादव यांनी केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech